Maharashtra New Expressway : कोणत्याही विकसित देशात तेथील रस्त्यांची कनेक्टिव्हिटी मोलाची भूमिका निभावत असते. भारतही जलद गतीने विकसित होणारा देश म्हणून ओळखला जात आहे. सध्या भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून लवकरच ती तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे.
यामुळे देशातील रस्त्यांची कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी नवनवीन महामार्ग विकसित केले जात आहेत. आतापर्यंत शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून आपल्या देशात हजारो किलोमीटर लांबीचे रस्ते, महामार्ग तयार करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे अजूनही अनेक महामार्ग प्रकल्पांची कामे आपल्या देशात सुरू आहेत. असाच एक महामार्ग प्रकल्प आहे मुंबई-दिल्ली महामार्ग. हा देशातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे. या महामार्गाची लांबी 1,386 किलोमीटर एवढी असून याचे काम एकूण 9 टप्प्यात केले जात आहे.
आतापर्यंत या महामार्गाचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. या महामार्गाचा पहिला अन दुसरा टप्पा वाहतुकीसाठी सुरू देखील झाला आहे. विशेष म्हणजे या महामार्गाच्या आठ टप्प्यांचे काम डिसेंबर 2024 अखेरपर्यंत पूर्ण होणार असा दावा केला जात आहे.
म्हणजे या महामार्गाने या चालू वर्षाच्या अखेरीस प्रवास करता येणार आहे. जेव्हा हा महामार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू होईल तेव्हा मुंबई ते दिल्ली हा 24 तासांचा प्रवास निम्म्याने कमी होणार आहे.
म्हणजे या दोन्ही शहरा दरम्यानचा प्रवास अवघ्या बारा तासांच्या कालावधीत पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा बहुमूल्य कालावधी आणि इंधनावरील खर्च वाचणार आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान , हरियाणा आणि दिल्ली या सहा राज्यांमधून हा महामार्ग जाणार आहे.
या प्रकल्पामुळे या संबंधित राज्यांचा एकात्मिक विकास सुनिश्चित होणार आहे. उद्योग, शिक्षण, कृषी, पर्यटन, सेवा अशा विविध क्षेत्राला या महामार्गामुळे बूस्टर मिळणार आहे.
सध्या या महामार्गाचा दिल्ली ते दौसा सवाई माधोपूर हा 293 किमीचा भाग आणि 245 किमीचा झालावाड-रतलाम हा मध्य प्रदेश/गुजरात सीमा विभागाचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू आहे.
हा देशातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणून ओळखला जाणार असून याचे आत्तापर्यंत 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. दिल्ली ते वडोदरा याचे 96% काम पूर्ण झाले असून हरियाणा ते मुंबई हे काम या वर्षाअखेरीस पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे.
एकंदरीत भारतातील सर्वाधिक लांबीच्या महामार्गाचे काम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणार असून यामुळे मुंबई ते दिल्ली हा प्रवास वेगवान होणार आहे.