Maharashtra News : राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील गोरगरीब जनतेसाठी काही कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा देखील समावेश होतो. खरतर अलीकडे दवाखान्याचा खर्च मोठा वाढला आहे.
वाढते प्रदूषण, बदललेली दिनचर्या, बदलती लाइफस्टाइल, कामाचा प्रेशर या सर्व कारणांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम पाहायला मिळत आहेत. मानवी आरोग्य काळाच्या ओघात आणखीनच धोक्यात आले आहे. दरम्यान या अशा परिस्थितीत गोरगरीब जनतेला दवाखान्याचा खर्च उचलणे म्हणजे अवघड बाब बनली आहे.
दवाखान्याच्या खर्चामुळे गोरगरीब जनतेच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील ऐरणीवर येतो. वेळप्रसंगी अशा गोरगरीब लोकांना कर्जाचे पैसे काढून दवाखान्याचा खर्च भागवावा लागतो. हेच कारण आहे की गोरगरिबांच्या आरोग्यासाठी, उपचारासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राबवली जात आहे.
या योजनेच्या माध्यमातून आधी दीड लाखापर्यंतचे उपचार मोफत दिले जात होते. परंतु शासनाने या योजनेची व्याप्ती वाढवली आहे आणि आता या योजनेअंतर्गत पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत दिले जाणार आहेत. यासोबतच आधी या योजनेचा लाभ केवळ केसरी आणि अंत्योदय रेशन कार्डधारकांना याचा लाभ मिळत होता.
आधी पिवळ्या, अंत्योदय अन्नयोजना, अन्नपूर्णा योजना व केशरी (१ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न) असलेल्या शिधापत्रिकाधारक कुटुंब, शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंब, बांधकाम व इतर बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंबीय या योजनेच्या लाभासाठी पात्र होते. आता मात्र योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.
आता या योजनेचा राज्यातील सर्व कुटुंबाना लाभ घेता येणार आहे.या योजनेच्या माध्यमातून जर एखाद्या व्यक्तीला गंभीर आजार झाला असेल किंवा शस्त्रक्रिया करायची असेल तर पाच लाखांपर्यंतचा मोफत उपचार तसेच शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
म्हणजे आता एका कुटुंबाला पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार या योजनेच्या अंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये मिळणार आहेत. दरम्यान या योजनेची व्याप्ती वाढवण्याबरोबरच या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या आजारांची आणि रुग्णालयांची देखील संख्या वाढवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकत्रितपणे राबवली जात असून या योजनेच्या माध्यमातून रुग्णांना मोफत उपचार पुरवले जात आहेत.
अकोला जिल्ह्यातील एकूण 21 रुग्णालयांमध्ये या योजनेअंतर्गत मोफत उपचार पुरवले जात आहेत. यात अकोला तालुक्यातील १४ आणि मूर्तिजापुर तालुक्यातील सात दवाखान्यात मोफत उपचार मिळत आहेत.