Maharashtra News : येत्या काही दिवसात अयोध्या येथे उभारल्या जाणाऱ्या भव्यदिव्य अशा प्रभू श्रीरामांच्या मंदिरात प्रभू श्रीराम यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 22 जानेवारी 2024 ला प्राणप्रतिष्ठा सोहळा राहणार आहे.
या सोहळ्याला देश-विदेशातील अनेक प्रमुख पाहुणे हजेरी लावणार आहे. जगातील अनेक हिंदू सनातनी या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत. खरे तर गेल्या अनेक वर्षांपासून श्रीराम जन्मभूमी लढाई सुरू होती.
अखेरकार माननीय सर्वोच्च न्यायालयाने श्रीराम जन्मभूमीवर प्रभू श्रीरामांचा अधिकार असल्याचे मान्य केले. यानंतर अयोध्या येथे भव्यदिव्य राम मंदिराच्या कामाला सुरुवात झाली. आता या मंदिराचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे.
अशा परिस्थितीत 22 जानेवारीला या भव्य राम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यामुळे जगातील तमाम रामभक्तांना ही मोठी भेट राहणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर या मंदिरात रामभक्तांना दर्शन सुद्धा घेता येणार आहे. यामुळे सध्या सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य शासनाने सर्वसामान्यांना प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा आनंदात साजरा करता यावा यासाठी अन छत्रपती शिवरायांच्या जयंती दिनानिमित्त आनंदाचा शिधा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकारने हा निर्णय घेऊन सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे.
या निर्णया अंतर्गत आता 22 जानेवारीपासून आनंदाचा शिधा वितरित केला जाणार आहे. दरम्यान आता आपण या आनंदाच्या शिध्यामध्ये नागरिकांना कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत हे पाहूया आणि याचा लाभ राज्यातील किती रेशन कार्डधारकांना होणार आहे ते देखील पाहणार आहोत.
राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयानुसार श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त आणि छत्रपती शिवरायांच्या जयंती दिनानिमित्त नागरिकांना सहा वस्तू दिल्या जाणार आहेत. साखर, खाद्यतेल, चणाडाळ, रवा, मैदा आणि पोहे या सहा वस्तू आनंदाच्या शिधामध्ये समाविष्ट राहणार आहेत.
याचा लाभ राज्यातील 1.68 कोटी रेशन कार्ड धारकांना होणार आहे. यासाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाने 549.86 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिलेली आहे. हा आनंदाचा शिधा फक्त शंभर रुपयात पात्र लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.
याचा लाभ राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्रय रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे.