Maharashtra News : आज 15 ऑक्टोबर, आज पासून संपूर्ण देशात नवरात्र उत्सवाचा सण साजरा होणार आहे. 24 ऑक्टोबर पर्यंत अर्थातच विजयादशमी पर्यंत नवरात्र उत्सव सुरु राहणार आहे. दरम्यान या सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.
ही बातमी घरगुती वीज ग्राहकांसाठी, कमर्शियल वीज ग्राहकांसाठी आणि कृषी वीज ग्राहकांसाठी देखील चिंतेचीच आहे. कारण की महावितरणने वीज दरात मोठी वाढ केली आहे. यामुळे महागाईने होरपळलेली जनता पुन्हा एकदा संकटात सापडणार असे चित्र तयार होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणने इंधन समायोजन शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम म्हणून आता पुन्हा एकदा वीज महाग होणार आहे. म्हणून सणासुदीच्या काळात महावितरणचा हा सर्वसामान्यांना एक मोठा शॉक आहे.
कंपनीने काढलेल्या नवीन आदेशानुसार आता सप्टेंबर महिन्याच्या वीजबिलासाठी आधीचे वीजदर आकारले जाणार आहे. प्रति युनिट 35 पैसे एवढा अधिकचा भार घरगुती वीज ग्राहकांवर पडणार आहे. विशेष म्हणजे समायोजन शुल्क आगामी काही महिन्यांसाठी याच पद्धतीने आकारले जाऊ शकते असा अंदाज आहे.
यामुळे फक्त सप्टेंबर महिन्याच्या वीज बिलासाठीच अधिकचा पैसा मोजावा लागणार असे नाही तर पुढील काही महिने सर्वसामान्यांना वीजबिलापोटी अधिकचे पैसे भरावे लागणार आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की महावितरणचे वीज खरेदी विभागाचे मुख्य अभियंता यांनी या संदर्भात आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार महावितरण सप्टेंबर मध्ये वापरलेल्या विजेवर समायोजन शुल्क आकारणार आहे. यानुसार आता सप्टेंबर महिन्याच्या वीज बिलासाठी घरगुती ग्राहकांना 35 पैसे प्रति युनिट, कृषी ग्राहकांना 10 आणि 15 पैसे प्रति युनिट आणि उद्योगांना 20 पैसे प्रति युनिट अधिकचा भार सोसावा लागणार आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये पुन्हा एकदा शासन आणि कंपनीविरोधात नाराजी पाहायला मिळणार आहे.