Maharashtra News : राज्य शासनाने अर्थसंकल्प 2023-24 मध्ये एक महत्त्वाची घोषणा केली होती. शिंदे-फडणवीस सरकारने संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या अनुदान रकमेत वाढ केली जाईल अशी घोषणा केली होती. या घोषणेनुसार 28 जून 2023 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निराधार योजनेच्या अनुदानात 500 रुपयांची वाढ करण्यासं मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली.
आधी या लाभार्थ्यांना एक हजार रुपये प्रति महिना एवढी पेन्शन मिळत होती. आता निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना एक हजार 500 रुपये प्रति महिना एवढे पेन्शन मिळणार आहे. मात्र, यासाठीचा शासन निर्णय निर्गमित झालेला नव्हता. दरम्यान, याचा शासन निर्णय काल अर्थातच 5 जुलै 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
यानुसार, आता राज्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांना आता प्रति महिना 1,500 रुपये एवढी पेन्शन मिळणार आहे.
यासोबतच, काल जाहीर झालेल्या शासन निर्णयानुसार या योजनेसाठी आवश्यक असलेल्या हयात प्रमाणपत्राबाबतच्या तरतुदीत देखील बदल करण्यात आला आहे. यानुसार आता त्याच आर्थिक वर्षात जर लाभार्थ्याने हयात प्रमाणपत्र दाखल केले तर लाभार्थ्याची बंद केलेली पेन्शन पुन्हा एकदा पूर्ववत होणार आहे.
तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्याच्या मुलाला सरकारी, निमशासकीय किंवा खाजगी नोकरी मिळाल्यानंतर मुलाचे व कुटुंबाचे उत्पन्न विचारात घेऊन मग त्या लाभार्थ्यांची पात्रता ठरवली जाणार आहे.
यासोबतच 2019 च्या शासन निर्णयानुसार लाभार्थ्याच्या मुलाची 25 वर्षे वयाबाबतची अट रद्द करण्यात आली आहे. तसेच याची अंमलबजावणी ही शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून होणार असल्याचे देखील शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.