Maharashtra News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यात मोठे सत्ता नाट्य पाहायला मिळाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी पाठिंबा दिला आहे. अजित पवार समवेत आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ देखील घेतली आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रात राजकीय गोंधळ पाहायला मिळत आहे.
अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी घेतलेला हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्कादायक राहिला आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ज्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची वाट पाहिली जात होती तो मंत्रिमंडळाचा विस्तार यानिमित्ताने पूर्ण झाला आहे.
दरम्यान अजित पवार उपमुख्यमंत्री बनल्यानंतर काल अर्थातच चार जुलै रोजी एक महत्त्वाची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत राज्य शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. यात विद्यार्थ्यांसाठी देखील एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे. राज्य शासनाने विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेता येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शासनाच्या या निर्णयाचे कौतुक केले जात आहे. अनेकांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. मंत्रिमंडळ बैठकीत काल झालेल्या निर्णयानुसार, राज्यातील मराठा, कुणबी आणि मराठा-कुणबी या जातीतील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती पुरवली जाणार आहे.
यासाठी सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजना राबवली जाणार आहे. या योजनेला कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे. यानुसार आता दरवर्षी राज्यातील 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.
जागतिक मानांकनामध्ये 200 च्या आत असलेल्या शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठांमधून शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी ही शिष्यवृत्ती पुरवली जाणार आहे. विशेष बाब अशी की ही योजना या वर्षापासूनच राबवली जाणार आहे.
यासाठी 25 कोटी रुपयांच्या खर्चासं देखील काल मान्यता देण्यात आली आहे. निश्चितच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस तसेच अजित पवार यांच्या सरकारने घेतलेला हा निर्णय राज्यातील मराठा समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूपच दिलासादायक सिद्ध होणार आहे. यामुळे या समाजातील विद्यार्थ्यांचे परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.