Maharashtra News : काल अर्थातच मंगळवारी, 13 जून 2023 रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य शासनाने विविध निर्णय घेतलेत. विद्यार्थी, कर्मचारी, शेतकरी हित लक्षात घेऊन शिंदे सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भात देखील एक महत्त्वाचा निर्णय झाला.
यामुळे राज्यातील पाचवी तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पाचवीनंतर तीन वर्षे आणि आठवी नंतर दोन वर्ष उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजनाअंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. सध्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती म्हणून किमान 250 ते कमाल 1000 रुपये पर्यंतची शिष्यवृत्ती दिली जाते.
तसेच माध्यमिक शिष्यवृत्ती म्हणून तीनशे ते कमाल 1500 पर्यंतची शिष्यवृत्ती संच निहाय मिळते. विशेष बाब म्हणजे गेल्या तेरा वर्षांपासून या शिष्यवृत्ती मध्ये शासनाकडून कोणतीच वाढ करण्यात आलेली नाही. यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या या शिष्यवृत्ती मध्ये वाढ करण्याची मागणी काही जाणकार लोकांनी उपस्थित केली होती. दरम्यान राज्य शासनाने आता या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
कालच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाचवी तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी पाच हजार आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष 7500 एवढी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय काल झाला आहे. ही शिष्यवृत्ती 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून लागू केली जाणार आहे.
म्हणजेच आता पाचवीच्या विद्यार्थ्याला प्रति महिना पाचशे रुपये मिळणार असून दहा महिन्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रति महिना 750 रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना देखील दहा महिने शिष्यवृत्ती मिळणार आहे.
निश्चितच राज्य शासनाचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचा असून यामुळे या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. या निर्णयाचे पालकांच्या माध्यमातून देखील स्वागत करण्यात आले आहे.