Maharashtra Panjabrao Dakh News : शेतकऱ्यांमध्ये पंजाबराव डख हे नाव विशेष लोकप्रिय बनले आहे. पंजाबराव आपल्या हवामान अंदाजासाठी शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. शेतकऱ्यांच्या मते त्यांचा हवामान अंदाज कधीच फेल ठरत नाही. यावर्षी देखील त्यांचा हवामान अंदाज तंतोतंत खराच ठरला असल्याचे मत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
खरंतर अमेरिकेच्या हवामान विभागाने तसेच स्कायमेट सारख्या प्रतिष्ठित हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनी यावर्षी महाराष्ट्रासह संबंध देशभरात दुष्काळाचे सावट राहणार असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र पंजाबरावांनी यावर्षी दुष्काळ पडणार नसून सुकाळ राहील, यंदा चांगला पाऊस होणार असा अंदाज व्यक्त केला होता.
दरम्यान त्यांचा हा अंदाज पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने उलटल्यानंतर आता खरा सिद्ध होताना पाहायला मिळत आहे. कारण की, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एक जून ते 27 जुलै दरम्यान राज्यात सरासरीपेक्षा १३ टक्के अधिक पाऊस झाला आहे.
याचाच अर्थ आत्तापर्यंत राज्यात समाधानकारक असा पाऊस झालेला आहे. काही भागात जरूर पावसाचे प्रमाण कमी आहे मात्र राज्यातील बहुतांशी भागात आता समाधानकारक पाऊस पडला आहे. दरम्यान पंजाबराव डख यांनी राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात 30 जुलै पर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
यवतमाळ, हिंगोली, वाशीम, परभणी, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, अमरावती, बुलढाणा, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, सोलापूर, अ.नगर जिल्ह्यातील काही भाग, बीड, छ.संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये 30 जुलै पर्यंत पावसाची शक्यता कायमच राहणार असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान त्यांनी उत्तर महाराष्ट्रात 5 ऑगस्ट पर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात पाच ऑगस्टपर्यंत पाऊस कायम राहणार असे मत त्यांनी व्यक्त केल आहे. याशिवाय त्यांनी यावर्षी राज्यात दुष्काळ राहणार नसून सर्वत्र चांगला पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
यावर्षी जवळपास 22 दिवस पावसाचे उशिराने आगमन झाले आहे यामुळे पाऊस 22 दिवस उशिराने महाराष्ट्रातून जाणार आहे. यंदा 26 ऑक्टोबर पर्यंत पावसाळा कायम राहणार असून 26 ऑक्टोबरनंतरचं यावर्षी थंडीचा जोर वाढेल असे मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
विशेष म्हणजे यंदा राज्यातील जवळपास सर्वच धरणे 100% क्षमतेने भरतील असं भाकीतही त्यांनी व्यक्त केल आहे. निश्चितच पंजाबरावांचे हे भाकीत जर खरं ठरलं तर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून यामुळे रब्बी आणि उन्हाळी हंगामातूनही शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळवता येणे शक्य होणार आहे.