Maharashtra Railway : 22 जानेवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीक्षेत्र अयोध्या येथील भव्य राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे. राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यावर आता हे मंदिर देशभरातील राम भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे.
यामुळे सध्या रामभक्तांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विशेष बाब अशी की, श्रीक्षेत्र अयोध्या येथे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत.
महाराष्ट्रातून देखील हजारोंच्या संख्येने भाविक श्रीक्षेत्र अयोध्या येथे जात आहेत. दरम्यान राज्यातील कोकण विभागातील रामभक्तांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे कोकणातील रामभक्तांसाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून श्रीक्षेत्र अयोध्येसाठी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यात अर्थातच फेब्रुवारी 2024 मध्ये वास्कोवरून अयोध्यासाठी दोन वेळा स्पेशल गाड्या चालवल्या जाणार आहेत.
ही गाडी कोकण रेल्वे मार्गवरून चालवली जाणार आहे. यामुळे राज्यातील रत्नागिरीसहित कोकणातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही गाडी कोकणातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. तसेच या गाडीची पहिली ट्रिप 12 फेब्रुवारी 2024 ला राहणार आहे.
विशेष म्हणजे या गाडीसाठी लवकरच आयआरसीटीसीच्या माध्यमातून बुकिंग सुरू होणार आहे. विशेष म्हणजे अशा ट्रेन देशातील 66 मार्गांवर सुरू होणार आहेत.
दरम्यान कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या आस्था ट्रेनचा प्रवाशांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
एकंदरीत रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे कोकणातील रामभक्तांना श्रीक्षेत्र अयोध्या येथे जाणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे राम भक्तांना सहजतेने श्री रामरायांचे दर्शन घेता येईल अशी आशा व्यक्त होत आहे.