Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. खरंतर 9 नोव्हेंबरपासून यंदाच्या दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. मुंबई, पुण्यातील नागरिक आता लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजच्या सणासाठी गावाकडे रवाना होत आहेत.
यामुळे रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे. नागरिकांना रेल्वेमध्ये जागा मिळत नाहीये. परिणामी अनेकांना रेल्वेचा प्रवास सोडून इतर पर्यायी मार्गाने गावाकडे जावे लागत आहे. दरम्यान नागरिकांची ही चडचण लक्षात घेता रेल्वेने महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि कौतुकास्पद असा निर्णय घेतला आहे.
तो म्हणजे रेल्वेच्या माध्यमातून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या मार्गावर विशेष ट्रेन चालवल्या जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दिवाळी आणि भाऊबीज सणाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या माध्यमातून नऊ विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत.
या गाड्या मुंबई येथील रेल्वे स्थानकावरून चालविल्या जाणार आहेत. राजधानी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून या विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार सीएसएमटी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दानापूर आणि नागपूर ते सीएसएमटी या मार्गावर या विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.
परिणामी नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास गतिमान होणार आहे. या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना ऐन सणासुदीच्या काळात मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे. दरम्यान आता आपण या विशेष ट्रेनचे वेळापत्रक आणि या गाड्या कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार नागपूर सीएसएमटी विशेष ट्रेनचे वेळापत्रक?
सेंट्रल रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, उपराजधानी नागपूरमधील नागरिकांसाठी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईला येण्यासाठी गुरुवारी रात्री एकेरी विशेष गाडी सोडली जाणार आहे. ही स्पेशल ट्रेन १६ नोव्हेंबरला रात्री १० वाजता नागपूर येथील रेल्वे स्थानकावरून रवाना होणार आहे आणि सीएसएमटी अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १.४० वाजता पोहचणार आहे.
दरम्यान, ही स्पेशल गाडी या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे आणि दादर या स्थानकावर या विशेष ट्रेनला थांबा दिला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
कसं राहणार सीएसएमटी दानापूर स्पेशल गाडीचे वेळापत्रक
मध्य रेल्वेने सांगितल्याप्रमाणे रेल्वे प्रवाशांसाठी मुंबई ते दानापूर दरम्यान स्पेशल गाडी चालवली जाणार आहे. ही ट्रेन १८ आणि २५ नोव्हेंबरला सकाळी ११.५ वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रवाना होणार आहे.
तसेच ही गाडी मुंबई येथून सुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजता दानापूरला पोहोचेल अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच परतीच्या प्रवासाकरिता ही स्पेशल गाडी दानापूर येथून १९ आणि २६ नोव्हेंबरला दुपारी साडेचार वाजता सोडली जाणार आहे.
दानापूर येथून सुटल्यानंतर ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री सव्वाअकरा वाजता राजधानी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर पोहोचणार आहे. दरम्यान या गाडीला दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार असल्याची माहिती सेंट्रल रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून यावेळी प्रसारमाध्यमांना देण्यात आली आहे.