Maharashtra Railway News : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांसाठी बजेट फ्रेंडली असल्याने तसेच याचे नेटवर्क देशातील कानाकोपऱ्यात पसरले असल्याने रेल्वेने प्रवास करण्याला विशेष पसंती दाखवली जाते. भारतीय रेल्वे सुद्धा आपल्या प्रवाशांच्या सोयीसाठी नेहमीच वेगवेगळे निर्णय घेत असते.
प्रवाशांचा प्रवास आरामदायी व्हावा त्यांना जलद गतीने प्रवास करता यावा यासाठी आत्तापर्यंत रेल्वेने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. दरम्यान, भारतीय रेल्वेने नुकताच सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळावा यासाठी आणखी एक मोठा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.
खरेतर रेल्वेने प्रवास करताना अनेकदा प्रवाशांना वेळेवर जेवण मिळत नाही. जर समजा जेवण उपलब्ध असेल तर जेवणाचे दर हे अधिक असतात. त्यामुळे सर्व सामान्यांची मोठी हेळसांड होत असते. अनेकदा पैशांच्या अभावामुळे सर्वसामान्य गरीब जनता पोटाला चिमटा देते आणि तसाच भुकेल्यापोटी प्रवास करत असते.
आता मात्र सर्वसामान्य गरीब प्रवाशांना स्वस्तात जेवण मिळणार आहे. रेल्वेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला असून आता फक्त 20 रुपयात पोटभर जेवण मिळणार आहे. याचा लाभ जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे.
याबाबतचा निर्णय नुकताच घेतला असून सदर निर्णया संदर्भातील निवेदन देखील जारी करण्यात आले आहे. अर्थातच याची अंमलबजावणी आता सुरू होणार आहे. यामुळे सर्वसामान्य गरीब प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त होत आहे.
दरम्यान आता आपण या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील कोणत्या रेल्वे स्थानकावर वीस रुपयात उपलब्ध होणार आहे तसेच जेवणामध्ये कोणकोणते पदार्थ असतील याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
20 रुपयात काय-काय मिळणार
मिळालेल्या माहितीनुसार, जनरल डब्यातील प्रवाशांना फक्त 20 रुपयात इकॉनॉमी मील जेवण दिले जाणार आहे. यात सात पुऱ्या (175 ग्रॅम) आणि बटाट्याची भाजी, लोणचं दिल जाणार आहे. याशिवाय प्रवाशांना 50 रुपयांतही जेवण मिळणार आहे.
पन्नास रुपयात दिले जाणारे जेवणाचे वजन 350 ग्रॅम राहणार आहे. यात दक्षिण भारतीय भात, राजमा-भात, खिचडी, कुलचे-भटुरा छोले, पावभाजी, मसाला डोसा दिला जाणार आहे. विशेष बाब अशी की, या योजनेअंतर्गत 3 रुपयांत पिण्याचे पाणी दिले जाणार अशी माहिती समोर आली आहे.
खरे तर या योजनेची सुरुवातीला 50 रेल्वे स्थानकावर चाचणी घेण्यात आली होती. म्हणजे हा उपक्रम पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरुवातीला राबवला गेला होता. दरम्यान हा पायलट प्रोजेक्ट खूपच यशस्वी झाला असून आता ही योजना देशभरातील शंभर रेल्वे स्थानकावर 150 काउंटर लावून सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील कोणत्या रेल्वे स्थानकावर 20 रुपयात जेवण
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, इगतपुरी, कर्जत, मनमाड, खंडवा, बडनेरा, शेगाव, पुणे, मिरज, दौंड, साईनगर शिर्डी, नागपूर, वर्धा, सोलापूर, वाडी आणि कुर्डूवाडी या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर या योजनेअंतर्गत जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे.