Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. वास्तविक राज्यभरात रेल्वे प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे. सुरक्षित, गतिमान आणि खिशाला परवडणारा प्रवास असल्याने भारतीय रेल्वेने प्रवास करण्यास नेहमीच प्रवासी पसंती दाखवतात. प्रामुख्याने मध्यमवर्गीय मोठ्या प्रमाणात रेल्वेने प्रवास करतो.
दरम्यान रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने एक अतिशय मोठा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील विविध रेल्वे स्थानकावर तब्बल 42 एक्सप्रेस गाड्यांना नवीन थांबे देण्यात आले आहेत. खरंतर विविध भागातून रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून आणि प्रवासी संघटनेच्या माध्यमातून विविध एक्सप्रेस गाड्यांना नवीन थांबे देण्याची मागणी जोर धरत होती.
यासाठी रेल्वे विभागाकडे मोठा पाठपुरावा करण्यात आला होता. वारंवार प्रवासी आणि प्रवासी संघटनेच्या माध्यमातून निवेदने दिली जात होती. काही स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून देखील यासाठी जोरदार पाठपुरावा करण्यात आला होता. याच पाठपुराव्यामुळे आता मध्य रेल्वेने महाराष्ट्रातून धावणाऱ्या तब्बल 42 एक्सप्रेस गाड्यांना नवीन थांबे दिले आहेत.
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर-धनबाद एक्सप्रेसला नागपूर विभागातील पिंपळखुटी येथे नवीन थांबा देण्यात आला आहे. निझामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस आणि एलटीटी-कोचिवली एक्सप्रेसला कोकण विभागातील खेड स्थानकात थांबा मिळाला आहे.
तसेच नागपूर, कल्याण, होटगी, कोपरगाव आणि कान्हेगाव स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर सहा महिन्यांसाठी काही गाडयांना थांबा देण्यात आला आहे. नागपूर रेल्वे स्थानकात यशवंतपूर- दिल्ली सराई रोहिला दुरांतो एक्सप्रेस आणि दिल्ली सराई रोहिल्ला- यशवंतपूर दुरांतो एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात आला आहे.
तसेच कल्याण रेल्वे स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -हावडा दुरांतो एक्सप्रेस,हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दुरांतो एक्सप्रेस, पाटणा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुविधा एक्सप्रेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पाटणा सुविधा एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस – काकीनाडा पोर्ट एक्सप्रेस, विशाखापट्टणम – साईनगर शिर्डी एक्सप्रेस, साईनगर शिर्डी -विशाखापट्टणम एक्सप्रेस या गाड्यांना थांबा देण्यात आला आहे.निश्चितच मध्य रेल्वेने महाराष्ट्रातून धावणाऱ्या 42 एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला असल्याने या निर्णयाचा राज्यभरातील रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.