Maharashtra Rain Alert 2023 : महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसाच्या खंडानंतर आता मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. गेल्या ऑगस्ट महिन्याची सुरवात झाली तेव्हा पाऊस गायब झाला आणि जवळपास संपूर्ण महिना राज्यात पाऊस बरसला नाही. गेला ऑगस्ट महिना कोरडा गेला तर या चालू सप्टेंबर महिन्याची सुरुवात जोरदार पावसाने झाली आहे.
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान पाहायला मिळाले आहे. राज्यात अनेक दिवस पावसाचा खंड पडला यामुळे शेतीपिके संकटात सापडली. मात्र आता पुन्हा एकदा पावसाला सुरवात झाली आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडला आहे. यात लोणावळा आणि चिंचवड भागात तर अतिवृष्टी झाली आहे. दरम्यान आता आगामी 48 ते 72 तास राज्यासाठी अति महत्त्वाचे राहणार आहेत. आगामी काही तासात राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागात पावसाचा जोर वाढणार असा अंदाज आहे.
या पार्श्वभूमीवर या संबंधित भागात हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात मोसमी पाऊस अंशत: सक्रिय झाला आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत काल दोन सप्टेंबर 2023 रोजी मध्यम ते मुसळधार पाऊस झाला आहे.
तसेच आगामी 48 ते 72 तासांत राज्यात सर्वत्र मध्यम ते जोरदार पाऊस पडणार असा अंदाज हवामान विभागाच्या माध्यमातून यावेळी वर्तवण्यात आला आहे. आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे, विदर्भात तीन ते सहा सप्टेंबर दरम्यान पावसाची शक्यता आहे तसेच मराठवाड्यात तीन ते पाच सप्टेंबर दरम्यान पावसाची शक्यता आहे आणि मध्य महाराष्ट्रात तीन ते चार सप्टेंबर दरम्यान पावसाची शक्यता तयार होत आहे.
या पार्श्वभूमीवर या संबंधित भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र कोकणात या कालावधीमध्ये कमी पाऊस पडणार असं पुणे वेधशाळेने यावेळी स्पष्ट केले आहे.
विशेष बाब अशी की पुण्यातील घाटमाथा भागावर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते असा अंदाजही पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. यामुळे राज्यातील जनतेला विशेषतः शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे खरिपातील पिकांना पुन्हा एकदा नवीन जीवदानही मिळेल असा आशावादही व्यक्त होत आहे.