Maharashtra Rain Alert : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यातील विविध भागात गेल्या काही तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हजेरी लागली आहे.
सध्या कोसळत असलेल्या पावसामुळे दुष्काळाच्या उंबरठावर उभा असलेल्या महाराष्ट्राला दिलासा मिळत असला तरी देखील काही भागात जास्तीचा पाऊस झाला असल्याने तेथील सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. विदर्भातील नागपूर जिल्ह्यातही अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
तिथे ढगफुटी सारखा पाऊस झाला असल्यामुळे शहरात चक्क चार ते पाच फूट पाणी साचले आहे. यामुळे संपूर्ण नागपुरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे फक्त नागपुरातच अशी परिस्थिती नव्हती तर मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, जळगाव, नाशिक आणि मराठवाड्यातील बीडमध्ये देखील जोरदार पावसाची हजेरी लागली. त्यामुळे निश्चितच खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पण काही भागात झालेल्या जास्तीच्या पावसाने तेथील शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान आज देखील भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील जवळपास 23 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
IMD म्हणतंय की, मध्य प्रदेशपासून आसामपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि परिसरात मोसमी वारे वाहत आहेत. याच हवामान प्रणालीमुळे सध्या महाराष्ट्रात जोरदार पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. आज राज्यातील कोकण खानदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या विभागात जोरदार पावसाची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर या चार विभागातील काही जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. आज कोकणातील ठाणे, पालघर, खानदेश मधील जळगाव, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे , छत्रपती संभाजीनगर, मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहणार असा अंदाज आहे.
या पार्श्वभूमीवर या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने २५ सप्टेंबरपासून म्हणजेच उद्यापासून मान्सूनचा भारतातून परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. उद्यापासून पश्चिम राजस्थान मधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.