Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रासहित देशातील हवामानात गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षाच्या सुरुवातीलाही मोठा अमुलाग्र बदल पाहायला मिळत आहे. राज्यात ऐन हिवाळ्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
सध्या महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये आकाश ढगाळ झाले असून विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे आणि चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भारतीय हवामान विभागाने आज देखील राज्यातील काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
खरंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 मध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागली होती. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झाले आहे.
रब्बी हंगामातील गहू हरभरा कांदा या मुख्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय आगामी 72 तास राज्यासाठी खूपच महत्त्वाचे ठरणार असून या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील तब्बल 18 जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे या संबंधित भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
कुठे बरसणार अवकाळी पाऊस
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोकणातील दक्षिण भागात, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. या भागात पुढील 72 तासात पाऊस हजेरी लावणार असे सांगितले जात आहे.
IMD ने सांगितल्याप्रमाणे राज्यातील खानदेश विभागातील धुळे आणि नंदुरबार येथे येत्या रविवारपर्यंत हलका पाऊस पडणार असा अंदाज आहे.
तसेच आज आणि उद्या उत्तर महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यात आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते.
तसेच आज अर्थातच 5 जानेवारी 2024 ला राज्यातील सातारा, सांगली, सोलापूर, बीड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिणामी या संबंधित भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.