Maharashtra Rain Alert : भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी दिवाळीच्या पूर्वसंध्येला एक अतिशय महत्त्वाची आणि मोठे बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे पावसासंदर्भात.
हवामान खात्याने राज्यात आगामी दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. वास्तविक, दिवाळीच्या काळात महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये नेहमीच कमी अधिक प्रमाणात पाऊस पाहायला मिळतो. या कालावधीमध्ये नेहमीच अवकाळी पाऊस हजेरी लावत असतो.
दरम्यान यावर्षी देखील दिवाळीच्या काळामध्ये महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान खात्याने राज्यात आठ नोव्हेंबर पर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे.
विशेष म्हणजे मुंबई हवामान केंद्राच्या काही तज्ञांनी आठ आणि नऊ नोव्हेंबरला एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल आणि याचा प्रभाव म्हणून महाराष्ट्रात दिवाळीच्या आठवड्यातही जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.
मात्र याबाबत आताच अंदाज बांधणे कठीण कारण की अजून कमी दाब क्षेत्र तयार झालेले नाही. दरम्यान हवामान विभाग या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.
तत्पूर्वी मात्र भारतीय हवामान खात्याने 8 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून या पार्श्वभूमीवर राज्यातील पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज सात नोव्हेंबर 2023 रोजी दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या पाच जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह हलकां पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर आज या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या संबंधित भागात उद्यापर्यंत हलक्या पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे. यामुळे या संबंधित भागातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना या कालावधीमध्ये अधिक सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
खरतर दक्षिण कोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस सुरू आहे.
पावसाचा जोर हा कमी आहे पण अवकाळी पावसामुळे या भागातील खरीप हंगामातील पीक काढणीवर विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे. मात्र या अवकाळी पावसाचा रब्बी हंगामातील पिकांना फायदा होऊ शकतो असा आशावाद देखील व्यक्त केला जात आहे.