Maharashtra Rain Alert : जुलैचा पहिला आठवडा कोरडा गेल्यानंतर चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांना वरूनराजाने दिलासा दिला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी तर अगदी अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आहे. अशातच आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती येत आहे. ही बातमी आहे मोसमी पावसा संदर्भात. हवामान खात्याने पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
खरेतर आय एम डी ने पुढील पाच दिवस कमी अधिक प्रमाणात पावसाची हजेरी राहणार असा अंदाज दिला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट, काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.
दरम्यान आता आपण हवामान खात्याने राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
19 जुलै : हवामान खात्याने आज विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या चार जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांनाही रेड अलर्ट मिळाला आहे.
कोकणातील दक्षिणेकडील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. या संबंधीत जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तसेच मुंबईसह उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांनाही आज ऑरेंज अलर्ट मिळाला आहे.
तसेच विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांसाठी अन मराठवाड्यातील बीड, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर वगळता उर्वरित जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. शिवाय, खानदेश वगळता उत्तर महाराष्ट्रातील उर्वरित दोन जिल्ह्यांसाठी आज येलो अलर्ट देण्यात आला आहे.
20 जुलै : उद्या फक्त चंद्रपूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट राहणार आहे. तसेच विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, गडचिरोली आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
याशिवाय उद्या उर्वरित विदर्भ, आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागासाठी देखील उद्या येल्लो अलर्ट राहणार आहे.
21 जुलै : 21 जुलैला पावसाचा जोर कमी होणार आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमधून पावसाचा जोर ओसरणार आहे. मात्र उर्वरित राज्यात कमी अधिक प्रमाणात का होईना पण पाऊस सुरूच राहणार असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.