Maharashtra Rain Alert : ऑगस्टचे पहिले दोन आठवडे उलटले आहेत. तिसऱ्या आठवड्याला सुरुवात होणार आहे. मात्र या ऑगस्ट महिन्यात, गेल्या बारा ते तेरा दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यात या चालू महिन्यात कुठेच मुसळधार पाऊस पडलेला नाही. गेल्या महिन्यात राज्यात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला होता. पण या चालू महिन्यात काही भागात पावसाची रिपरीप सुरू आहे तर काही ठिकाणी पाऊसच होत नाहीये.
यामुळे खरीप हंगामातील फुलोरा अवस्थेत असलेले सोयाबीन पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. कापसाच्या पिकाला देखील आता पावसाची आवश्यकता आहे. याव्यतिरिक्त खरीप हंगामातील इतरही महत्त्वाच्या पिकांसाठी पाण्याची नितांत गरज आहे. जर येत्या काही दिवसात मोठा पाऊस पडला नाही तर खरीप हंगामातील पिके करपण्याचा धोका आहे.
अशातच भारतीय हवामान विभाग पुण्याचे निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी पावसासंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट दिले आहे. खुळे यांनी सांगितल्याप्रमाणे आज 13 ऑगस्ट 2023 ते 20 ऑगस्ट 2023 दरम्यान राज्यात पावसाचा खंड राहणार आहे. म्हणजेच हा संपूर्ण आठवडा कोरडाच जाणार असे चित्र आहे. आधीच गेल्या 13 दिवसांपासून राज्यात पाऊस नाहीये आणि आता आणखी एक आठवडा पावसासाठी वाट पाहावी लागणार असे खुळे यांच्या हवामान अंदाजावरून स्पष्ट होत आहे.
13 ते 20 ऑगस्ट दरम्यान मान्सून खण्ड प्रणालीमुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडू शकतो. तसेच या कालावधीत मुंबईसह कोकणात मात्र मध्यम पावसाचा अंदाज असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान 21 ऑगस्ट पासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. 21 पासून श्रावण सऱ्या बरसतील असा अंदाज आहे. 21 ऑगस्ट पासून 10 सप्टेंबर पर्यन्त संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा पाऊस होणार आहे.
या कालावधीत जोरदार तर नव्हे पण काहींश्या मध्यम पावसाची शक्यता जाणवत असल्याचा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांच्या माध्यमातून यावेळी वर्तवण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमीच पावसाचा अंदाज आहे. पण सप्टेंबर महिन्यात विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस पडणार असा अंदाज आहे.
पाऊस गायब होण्याचे कारण?
खुळे यांनी सांगितल्याप्रमाणे, बंगालच्या उपसागरातील आर्द्रता ईशान्येकडे म्हणजे प्रशांत महासागरातील दक्षिण कोरियन किनारपट्टीवरील ‘ खनून ‘ तर जपान किनारपट्टीवरील ‘ लान ‘ नावाच्या दोन चक्रीवादळानीं म्हणजे टायफुन ने खेचली आहे. यामुळे देशातील दक्षिणेकडील 5 राज्याबरोबर महाराष्ट्रातही या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात पावसाची उघडीप बघायला मिळत आहे.
मात्र आता यापैकी एक चक्रीवादळ निवळले असून दुसर देखील निवळण्याच्या तयारीत आहे. यामुळे राज्यात 21 ऑगस्ट नंतर पाऊस पडू शकतो अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान खुळे यांचा हा अंदाज खरा ठरला तर राज्यातील शेतकऱ्यांना 21 ऑगस्ट नंतर पुन्हा एकदा पाऊस अनुभवायला मिळणार आहे. पण 21 ऑगस्ट नंतर देखील राज्यात खूपच जोराचा पाऊस पडणार नाही तर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असे सांगितले जात आहे.