Maharashtra Rain Alert : भारतीय हवामान खात्याने 9 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात होणार असा अंदाज व्यक्त केला होता. या अंदाजानुसार आता महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे राज्यातील काही भागात गारपीट देखील होत आहे.
यामुळे शेतकऱ्यांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल राज्यातील अमरावती वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपीटीची हजेरी लागली.
यामुळे या जिल्ह्यातील संबंधित भागातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा हे पीक पूर्णपणे वाया गेले आहे.
यामुळे आधीच विविध नैसर्गिक संकटांनी बेजार झालेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, काल विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील चांदूररेल्वे, धामनगाव रेल्वे व अन्य काही तालुक्यात पाऊस, गारपीट झाली आहे.
वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातही गारपीट व पाऊस झाल्याची नोंद आहे. यामुळे या संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे खूपच नुकसान झाले आहे.
अशातच आज अर्थातच 12 फेब्रुवारी 2024 रोजी पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली असून शेतकऱ्यांना पावसाची शक्यता लक्षात घेता आपल्या शेती पिकांची विशेष काळजी या ठिकाणी घ्यावी लागणार आहे.
काय म्हणतंय भारतीय हवामान विभाग ?
बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा सध्या महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार करत आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, आज देखील राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता आहे.
आज राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असून या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने या संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.
आज विदर्भ विभागातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.