Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात गेल्या 11 ते 12 दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. मान्सून आगमनाला आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला असून मान्सून येण्याआधी राज्यात पावसाची धुवाधार बॅटिंग होत आहे. आज देखील राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे आज आणि उद्या हे दोन दिवस राज्यात वादळी पावसाची शक्यता कायम राहणार असा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता कायम राहणार असा अंदाज आहे.
दुसरीकडे राजधानी मुंबईत पुढील दोन दिवस उकाडा जाणवणार असल्याचे आयएमडीने आपल्या बुलेटीन मध्ये स्पष्ट केले आहे. मुंबईत आलेल्या वादळानंतर त्या ठिकाणी उष्णतेत कमालीची वाढ झाली आहे.
यामुळे मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून उकाडा जाणवत असून कमाल तापमान 40°c पर्यंत पोहोचले आहे. विशेष म्हणजे पुढील दोन दिवस मुंबईत असेच दमट आणि उष्ण हवामान राहणार आहे. दुसरीकडे राज्यातील उर्वरित भागांमध्ये कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
तसेच काही भागांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. हवामान खात्याने आज आणि उद्या राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असे म्हटले आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या पुणे, अहमदनगर, सातारा, नाशिक या मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि बीड या जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आहे. तसेच खानदेश विभागातील जळगाव मध्ये देखील आज आणि उद्या पाऊस हजेरी लावणार असे आयएमडीने म्हटले आहे.
विशेष म्हणजे या संबंधित भागांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. अर्थातच या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.
एवढेच नाही तर आज आणि उद्या मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, मराठवाडा विभागातील जालना, नांदेड, लातूर, विदर्भ विभागातील अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पावसाची बॅटिंग पाहायला मिळू शकते.
परिणामी उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र या वादळी पावसाचा शेती क्षेत्राला मोठा फटका बसणार आहे. यामुळे फळ पिकांसमवेतचं भाजीपाला आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते अशी भीती आहे.
विशेष म्हणजे हवामान खात्याने राज्यातील काही भागांमध्ये आज आणि उद्या गारपीट देखील होऊ शकते असे म्हटले असल्याने यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची आणि पशुधनाची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन जाणकारांनी केले आहे.