Maharashtra Rain Alert : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रासहित देशातील हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. हवामानात होत असलेल्या बदलांमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, गेल्या वर्षी पावसाळ्यात अपेक्षित असा पाऊस झालेला नाही. याशिवाय रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
गेल्यावर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता. या चालू वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली.
दरम्यान आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ञ, हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.
साबळे यांनी राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला आहे. राज्यातील जवळपास 25 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी जाहीर केला आहे. आता आपण डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी वर्तवलेला सविस्तर अंदाज पाहणार आहोत.
कसा आहे डॉक्टर रामचंद्र साबळे यांचा हवामान अंदाज?
साबळे यांनी सांगितल्याप्रमाणे, येत्या रविवारी आणि सोमवारी म्हणजेच 11 आणि 12 फेब्रुवारी 2024 ला मराठवाडा आणि विदर्भात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर दुसरीकडे मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.
विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तसेच मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये 11 आणि 12 फेब्रुवारीला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज साबळे यांनी व्यक्त केला आहे.
यामुळे आता निवृत्त हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांचा हा हवामान अंदाज खरा ठरतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.