Maharashtra Rain Alert : गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. काही भागात तर गारपीट झाल्याची नोंद देखील करण्यात आली. जोरदार अवकाळी पावसामुळे आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.
अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक पाण्यामुळे वाया गेले. विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा शेवट पावसानेच झाला आणि डिसेंबरची सुरुवातही पावसाने झाली.
डिसेंबरच्या अगदी सुरुवातीला बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या नवख्या चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. महाराष्ट्राचा देशातील अनेक राज्यांमध्ये चक्रीवादळामुळे जोरदार पावसाची हजेरी लागली.
तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश मध्ये पावसाचा जोर अधिक होता. या राज्यांमध्ये चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले. मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली. आता मात्र बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ पूर्णपणे निवळले आहे.
मात्र असे असतानाही राज्यावर अवकाळी पावसाचे सावट कायमच आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांना अधिक सावध राहून आपल्या शेतीपिकांची काळजी घ्यावी लागणार आहे. खरे तर चक्रीवादळ निवळल्यानंतर देशातील विविध भागांमध्ये थंडीने जोर पकडला आहे.
कडाक्याची थंडी पडू लागली आहे. राज्यातही काही भागात थंडीचा जोर वाढत आहे. राजधानी मुंबईत सुद्धा गेल्या दोन ते तीन दिवसांपासून गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे.
इकडे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नासिक, अहमदनगर जिल्ह्यांमधील काही भागात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. गेल्या वर्षभरापासून कपाटात असलेले स्वेटर, मफलर यांसारखे उबदार कपडे आता बाहेर निघाले आहेत.
अशातच आता भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासात राज्यातील कोकण, विदर्भ विभागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. महाराष्ट्रासोबतच दक्षिण भारतातही आज पावसाची शक्यता आहे.
केरळ, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल या भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम पाऊस होणार तसेच केरळ आणि लक्षद्वीपमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. निश्चितचं हवामान खात्याचा हा अंदाज चिंता वाढवणारा आहे.