Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय तर काही ठिकाणी पावसाची रिपरीप सुरू आहे. तसंच काही भागात ढगाळ हवामान पाहायला मिळतंय. राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
मात्र काही ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस झाला असून यामुळे शेती पिकांना मोठा फटका बसलाय. शिवाय अति मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती तयार झाली असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
ढगाळ हवामानामुळे आणि अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये पिके पिवळे पडत आहेत. सोयाबीन, कापूस यांसारख्या पिकांवर बदललेल्या हवामानाचा विपरीत परिणाम पाहायला मिळतोय. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पिके पिवळे पडत असल्याने याचा वाढीवर विपरीत परिणाम होणार आहे.
यामुळे पीक उत्पादनात घट येईल अशी भीती आहे. अशातच आता भारतीय हवामान खात्याने पावसा संदर्भात एक नवीन अंदाज जारी केला आहे. खरंतर आज राज्यातील अनेक भागांमधून पावसाचा जोर ओसरला होता. मात्र पुढील पाच दिवस राज्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.
कुठं बरसणार पाऊस?
आज राज्यातील दक्षिण कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात अति जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील सातारा देखील अशीच परिस्थिती कायम राहणार असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर या तिन्ही जिल्ह्यांना आज रेड अलर्ट मिळाला आहे.
याशिवाय आज उत्तर कोकणातील ठाणे आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यालाही आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यासोबतच आज खानदेशातील नंदुरबार, मराठवाड्यातील परभणी आणि विदर्भातील वर्धा, अमरावती, नागपूर, वाशिम, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यात पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
उर्वरित राज्यात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे. उद्या राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे.
रविवारी, सोमवारी आणि मंगळवारी देखील या भागात ठीकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मंगळवार पर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असे आयएमडीने यावेळी स्पष्ट केले आहे.