Maharashtra Rain : राज्यातील हवामानात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने बदल होत आहे. अवेळी पडणारा पाऊस शेतकऱ्यांची चिंता वाढवत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात राज्यात अवकाळी पावसाची हजेरी लागली.
यानंतर या नवीन वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली. जानेवारीच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस बरसला आणि आता फेब्रुवारी महिन्यातही अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला आहे.
मराठवाड्यात आणि विदर्भात गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ हवामान कायम आहे अन अवकाळी पाऊस सुरु आहे. विशेष म्हणजे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट झाली आहे.
वर्धा जिल्ह्यातील चार ते पाच तालुक्यात गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. शेकडो एकरावरील रब्बी पिके गारपीटीमुळे खराब झाली आहेत.
विशेष बाब अशी की, आज देखील राज्यात अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
पुणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज अर्थातच 13 फेब्रुवारीला आणि उद्या 14 फेब्रुवारी 2024 ला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे.
विदर्भात पुढील तीन ते चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील आगामी काही दिवस अवकाळी पाऊस बरसत राहणार असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. आयएमडीने राज्यातील जवळपास 14 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
कोणत्या जिल्ह्यात बरसणार अवकाळी पाऊस
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 48 तास विदर्भ विभागातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे.
विशेष म्हणजे यापैकी काही जिल्ह्यांमध्ये गारपिट देखील होऊ शकते. दुसरीकडे मराठवाड्यातील जालना, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांमध्ये आगामी काही दिवस अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
या तीन जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. उर्वरित राज्यात काही ठिकाणी हवामान ढगाळ राहील मात्र अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार नाही.