Maharashtra Rain : महाराष्ट्रात गेल्या 12-13 दिवसांपासून वादळी पाऊस सुरू आहे. वादळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तथापि हा मोसमी पाऊस नसून पूर्व मौसमी पाऊस आहे. मोसमी पावसाला महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे.
दरम्यान गेल्या 12-13 दिवसांपासून सुरू असलेले हे वादळी पावसाचे सावट आणखी काही दिवस महाराष्ट्रावर कायम राहणार असा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात 24 मे पर्यंत वादळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
या कालावधीत राज्यातील विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे आज राज्यातील काही भागांमध्ये वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी उष्णतेची लाट येऊ शकते असा अंदाज आहे.
अर्थातच राज्यात मिश्र हवामान पाहायला मिळणार आहे. आज राज्यातील मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ विभागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या भागात आज वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाची आणि पशुधनाची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड या जिल्ह्यांमध्ये आज वादळी पावसाची शक्यता आहे.
तसेच विदर्भ विभागातील अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाडा विभागातील यासंबंधीत जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.
याशिवाय आज पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. विशेष म्हणजे 24 मे पर्यंत राज्यात पावसाची शक्यता काय राहणार आहे.
या कालावधीत राज्यातील अकोला, अमरावती, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार असा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे.