Maharashtra Rain : महाराष्ट्रात 11 जूनला मान्सूनचे आगमन झाले होते. तेव्हापासून 23 जूनपर्यंत मान्सून दक्षिण कोकणातच होता. मात्र काल म्हणजेच 24 जून 2023 रोजी मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. मान्सूनने तळ कोकणाचा काठ सोडला आहे. मान्सूनने काल अलिबाग पर्यंत मजल मारली. मोसमी वारे अलिबागमध्ये जोराने वाहत आहेत.
एकूणच काय मान्सून आता मुंबईच्या वेशीवर दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे. हवामान विभागानुसार, पुढील 48 तासात मान्सून हा मुंबईमध्ये दाखल होणार आहे. खरंतर काल अर्थात शनिवारी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. मात्र अद्याप मान्सून आगमनाचे निकष पूर्ण झालेले नाहीत.
यामुळे जेव्हा निकष पूर्ण होतील तेव्हा मुंबईमध्ये मान्सून पोहोचल्याची घोषणा भारतीय हवामान विभाग करणार आहे. इकडे विदर्भाचा विचार केला असता पूर्व विदर्भात म्हणजेच नागपूर विभागात सर्व जिल्ह्यात मान्सून पोहोचला आहे. तसेच येत्या काही तासात पश्चिम विदर्भात देखील मान्सून आगेकूच करणार असल्याचे सांगितले जात आहे.
याव्यतिरिक्त दक्षिण मध्य महाराष्ट्रात देखील मान्सूनची प्रगती उल्लेखनीय आहे. मराठवाड्यात देखील मान्सून पोहोचला आहे. परंतु संपूर्ण महाराष्ट्रात अद्याप मान्सून पोहोचलेला नाही. पण येत्या काही दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असा अंदाज आहे. दरम्यान, आज भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
आजही राजधानीत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच रायगड जिल्ह्यात पुढील चार दिवस आणि रत्नागिरी जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस होणार असा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे.
दक्षिण आणि उत्तर कोकणात पुढील पाच दिवस बहुतांशी भागात पाऊस होणार असा अंदाज आहे. याव्यतिरिक्त आजच 25 जून 2023 रोजी राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज राज्यातील जवळपास 17 जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोणत्या जिल्ह्यात पडणार मुसळधार !
दक्षिण कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यांना आरेंज अलर्ट जारी झाला आहे.
तसेच सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर वादळी पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे.