Maharashtra Rain : सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात मान्सून सक्रिय झाला आहे. मात्र मान्सून सक्रिय झाला असला तरीही अपेक्षित असा पाऊस पडत नाही. अजूनही राज्यातील अनेक जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस झालेला नाही. यामुळे खरीप हंगामातील पेरण्या लांबणीवर पडत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी पेरणी योग्य पाऊस झालेला नसतानाही पेरणी करून घेतली आहे.
यामुळे ज्या शेतकऱ्यांची पेरणी पूर्ण झालेली नाही ते शेतकरी बांधव मुसळधार पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी कमी पाऊस असताना पेरणी केली आहे ते देखील मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. एकंदरीत यंदा खरीप हंगाम संकटात सापडला आहे. कोकण तसेच घाटमाथ्यावर नक्कीच मुसळधार पाऊस होत आहे मात्र उर्वरित राज्यात पावसाचा जोर खूपच कमी आहे.
अशातच भारतीय हवामान विभागाने आजचा हवामान अंदाज जारी केला आहे. आज हवामान विभागाने राज्यातील आठ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावरील आठ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून उर्वरित राज्यात मात्र हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज यावेळी भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
IMD ने वर्तवलेल्या आजच्या सुधारित हवामान अंदाजानुसार, कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर कोकणातील पालघर आणि दक्षिण कोकणातील रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातही पाऊस होणार आहे.
मात्र पुणे जिल्ह्याचा घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचा अंदाज आहे. याशिवाय राजधानी मुंबई, ठाणे, रत्नागिरीसह नाशिक, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असा अंदाज आयएमडीने बांधला आहे. उर्वरित राज्यात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय !
कोकणातील तसेच मध्य महाराष्ट्रातील पालघर, रायगड, पुणे या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, रत्नागिरी, नाशिक, सातारा या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.