Maharashtra Rain : राज्यासह देशातील हवामानात गेल्या महिन्यापासून सातत्याने बदल पाहायला मिळत आहेत. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला. राज्यातील काही भागात अक्षरशः गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
विशेष म्हणजे या चालू महिन्याची अर्थातच डिसेंबर महिन्याची सुरुवात देखील अवकाळी पावसानेचं झाली. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील विविध भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. या पावसामुळे देखील रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. आता मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पावसाळी वातावरण पूर्णपणे निवळले आहे.
आता राज्यात कुठेच ढगाळ हवामान पाहायला मिळत नसून थंडीचा जोर वाढू लागला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात थंडीची तीव्रता वाढू लागली आहे. तर दुसरीकडे देशातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.
तमिळनाडू मध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून त्या ठिकाणी सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने आगामी पाच दिवस तामिळनाडूत असाच मुसळधार पाऊस सुरू राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. तामिळनाडूमध्ये गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे तिथे पूरस्थिती निर्माण झाली आहे.
सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत तर झालेच आहे शिवाय शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. हवामान खात्याने आगामी काही दिवस तामिळनाडूमध्ये असाच पाऊस सुरू राहणार असा अंदाज व्यक्त केला असल्याने निश्चितच तेथील सर्वसामान्य जनतेची आणि शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे.
दुसरीकडे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली आहे. काही राज्यांमध्ये बर्फवृष्टी देखील होत आहे. त्याचा परिणाम म्हणून आपल्या महाराष्ट्रात आता गारठा वाढू लागला आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने आगामी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहिल आणि अवकाळी पाऊस पडणार नाही असा अंदाज व्यक्त केला आहे. सोबतचं राज्यात गारठा आणखी वाढण्याची शक्यता IMD ने व्यक्त केली आहे.