Maharashtra Rain : महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर सारख्या शहरांमध्ये पूरस्थिती तयार झाल्यानंतर आता पुन्हा एकदा सामान्य जनजीवन पूर्वपदावर आले आहे. यामुळे संबंधित भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता अनेक ठिकाणी तयार झालेली पूर परिस्थिती ओसरली आहे. मात्र अजूनही जोरदार पावसाचे सत्र सुरूच आहे.
आज आठवड्याच्या पहिल्याचं दिवशी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर अनेक ठिकाणी आज ढगाळ हवामान पाहायला मिळाले. पण सततच्या पावसामुळे अन ढगाळ हवामानाने खरीप हंगामातील पिकांवर विपरीत परिणाम होत आहे.
खरिपातील कापूस, सोयाबीन सारख्या सर्वच महत्त्वाच्या पिकांना याचा फटका बसला आहे. सध्याच्या हवामानाचा पीक वाढीवर विपरीत परिणाम होत असून उत्पादनात घट येणार अशी भीती व्यक्त होत आहे.
अशातच हवामान खात्याने आज आणि उद्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होणार असा अंदाज दिला आहे. तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे.
आज कुठे बरसणार मुसळधार पाऊस ?
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे आज मुंबई सह संपूर्ण कोकणात, संपूर्ण खानदेशसह मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक अन विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांना आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असा अंदाज आहे.
उद्या कुठं बरसणार जोरदार पाऊस ?
भारतीय हवामान खात्याने उद्याही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड, अन मध्य महाराष्ट्र विभागातील सातारा, पुणे या भागात ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट मिळाला आहे. तसेच उर्वरित कोकण आणि उर्वरित मध्य महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
बुधवारपासून पावसाचा जोर वाढणार
उद्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर थोडासा कमी होणार आहे. पण बुधवारपासून पुन्हा एकदा पावसाची तीव्रता वाढणार असे बोलले जात आहे. 31 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान कोकण, विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात ठिकठिकाणी जोरदार पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे. या काळात राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र हलका ते मध्यम पाऊस होणार आहे.