Maharashtra Rain : यंदा पावसाचा लहरीपणा प्रकर्षाने जाणवत आहे. गेली तीन वर्ष चांगला पाऊस झाल्यानंतर यंदा मात्र गेल्या महिन्यातील काही दिवस वगळता समाधानकारक पाऊस झालेला नाही. तसेच जुलै महिन्यात काही भागात कमी वेळेत जास्तीचा पाऊस झाला आहे. कमी वेळेत जास्तीच्या पावसाने मात्र शेतकऱ्यांचा फायदा कमी आणि तोटा जास्त झाला आहे.
दरम्यान या चालू ऑगस्ट महिन्यात आत्तापर्यंत कुठेच म्हणावा तसा पाऊस पाहायला मिळालेला नाही. हवामान विभागाने आधीच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान हवामान विभागाचा हा अंदाज आतापर्यंत तरी खरा ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आय एम डी च्या माध्यमातून पुढील सात दिवसांचा हवामान अंदाज वर्तवण्यात आला आहे.
काय आहे हवामान अंदाज ?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाची मोठी तूट पाहायला मिळाली आहे. राज्यात सरासरी पेक्षा 53% कमी पाऊस झाला असेल. म्हणजेच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पावसाची 53% एवढी तूट आहे.
राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. साहजिकच यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढत आहे. या संपूर्ण हंगामात आत्तापर्यंत मुंबई उपनगरसह दक्षिण कोकणातील रायगड, उत्तर कोकणातील ठाणे आणि पालघर तसेच नांदेड अन यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सरासरी पेक्षा अतिरिक्त पाऊस झाला आहे. तसेच सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यात जून पासून म्हणजे पावसाळा सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत २० टक्क्यांहून कमी पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान राजधानी मुंबईमध्ये आजपासून पुढील चार ते पाच दिवस तीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई सह कोकणात देखील 10 ऑगस्ट पर्यंत पावसाचा अंदाज आहे. याव्यतिरिक्त मध्य महाराष्ट्रात उद्यापर्यंत पाऊस पडेल असे सांगितलं जात आहे. यासोबतच मराठवाड्यात आज, विदर्भात आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे.