Maharashtra Rain : गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यासह देशातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागली होती. तसेच डिसेंबरच्या सुरुवातीला देखील अवकाळी पाऊस झाला आणि आता डिसेंबर महिन्याचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसानेच होणार असा अंदाज आहे.
राज्यात बरसलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला असल्याने याचा रब्बी पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या 48 तासात देशातील विविध राज्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यासह उत्तरेकडील राज्यांमधील किमान तापमान वाढले आहे.
याचा परिणाम म्हणून ढगाळ हवामान तयार होत आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील ढगाळ हवामान तयार झाले आहे.
विशेष म्हणजे भारतीय हवामान विभागाने राज्यासह देशातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी लागणार असा अंदाज दिला आहे.
IMD कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, येत्या दोन ते तीन दिवसांत देशातील काही भागात अवकाळी पावसाच्या सऱ्यां कोसळण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे, वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि अरबी समुद्रावर बाष्पयुक्त ढग निर्माण झाल्यामुळे देशातील काही राज्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
यात तामिळनाडू, आंध्र प्रदेश अरुणाचल आणि केरळसह महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील काही ठिकाणी उद्यापासून अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे.
राज्यात ३१ डिसेंबरपासून २ जानेवारीपर्यंत पाऊस हजेरी लावणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची काळजी घ्यावी लागणार आहे.
अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो अशी भीती व्यक्त होत आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकाची काळजी घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.