Maharashtra Rain : जुलै महिना संपत आला आहे. उद्या जुलै महिन्याची सांगता होणार आहे. या महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला जोरदार पाऊस झाला आहे. कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची हजेरी लागली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस झाला होता. यामुळे पूरजन्य परिस्थिती पाहायला मिळाली.
पूरस्थितीमुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते. शेतकऱ्यांच्या शेती पिकांना देखील याचा मोठा फटका बसला. पण आता गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी झाला आहे. पावसाने आता विसावा घेतला असल्याचे चित्र आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला देखील राज्यात पावसाची उघडीप पाहायला मिळाली होती आणि आता महिन्याच्या शेवटीही पावसाने विसावा घेतला आहे. तथापि भारतीय हवामान खात्याने आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पाऊस होणार असा अंदाज आहे. मात्र उर्वरित राज्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. आज कोकणातील फक्त दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे.
म्हणजे उर्वरित कोकणात पावसाची उघडीप पाहायला मिळू शकते. मध्य महाराष्ट्रात सुद्धा फक्त घाटमाथ्यावर पावसाचा जोर राहील अन उर्वरित भागात पावसाची उघडीप राहणार आहे.
आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे, आज कोकणातील दक्षिणेकडील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. या दोन्ही जिल्ह्यांना आज जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातही आज जोरदार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना देखील आज येलो अलर्ट मिळाला आहे. उर्वरित राज्यात मात्र फक्त हलका ते मध्यम पाऊस होणार आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील हे संबंधित चार जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये कोणताच इशारा देण्यात आलेला नाही. परंतु नुकत्याच दोन दिवसांपूर्वी हवामान खात्यातील तज्ञांनी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 3 ऑगस्टपर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान तज्ञांनी कोकणात तीन ऑगस्टपर्यंत अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच खानदेश आणि विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये तीन ऑगस्टपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
खानदेश वगळता संपूर्ण मध्य महाराष्ट्रात 31 जुलै पर्यंत मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र या संबंधित भागात एक ऑगस्ट पासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. दुसरीकडे मराठवाड्यात तीन ऑगस्टपर्यंत मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.