Maharashtra Rain : गेल्या महिन्यात अर्थातचं जून महिन्यात महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिले आहे. मान्सूनच्या पहिल्या महिन्यात जोरदार पाऊस होणार अशी आशा शेतकऱ्यांना होती. कारण की यंदा मान्सूनचे वेळे आधीच आपल्या महाराष्ट्रात आगमन झाले होते. यावर्षी मानसून वेळेआधी दाखल झाला मात्र काही काळ मान्सूनचा प्रवास रखडला होता.
त्यामुळे जून मध्ये महाराष्ट्रात पावसाचा लपंडाव पाहायला मिळाला. राज्यातील कोकण आणि घाटमाथा विभाग वगळता जवळपास सर्वच भागांमध्ये पावसाचे प्रमाण फारचं कमी राहिले. गेल्या महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
यामुळे राज्यातील शेतकरी बांधव चिंतेत सापडले आहेत. तसेच, जुलै महिन्यात पावसाची परिस्थिती कशी राहणार असा सवाल आता उपस्थित होत आहे. गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती.
काही भागात साधा एक पाऊसही झाला नव्हता. यामुळे उन्हाळ्याच्या अगदी सुरुवातीलाच पिण्याच्या पाण्याची टंचाई पाहायला मिळाली. यंदा मात्र चांगला जोरदार पाऊस राहणार असा अंदाज हवामान खात्याने मान्सून आगमना आधीच वर्तवला आहे.
पण आता मान्सूनचा पहिला महिना उलटला असून अजूनही महाराष्ट्रातील अनेक भागांमधील शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
दरम्यान हवामान खात्यातील निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी जून महिन्यात जशी परिस्थिती होती तशी परिस्थिती जुलैमध्ये राहणार नाही असे स्पष्ट केले आहे.
त्यांनी जुलैमध्ये महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच 106% पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच उर्वरित जिल्ह्यांमध्ये 94 ते 104% पावसाची म्हणजेच सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असा अंदाज दिला आहे.
त्यामुळे आता आपण नेमक्या कोणत्या जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस आणि कोणत्या जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस होणार याविषयी जाणून घेणार आहोत.
कोणत्या भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस
खानदेशातील जळगाव, मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड आणि विदर्भातील यवतमाळ, बुलढाणा या 6 जिल्ह्यांमध्ये सरासरी पेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
संबंधित सहा जिल्ह्यांमध्ये जुलै महिन्यात 94 ते 104 टक्के एवढा पाऊस होणार असा अंदाज आहे. उर्वरित 30 जिल्ह्यांमध्ये मात्र जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस पडणार आहे.