Maharashtra Rain : राज्यातील हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता असून पुन्हा एकदा महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट तयार होणार आहे. यामुळे रब्बी हंगामातील शेती पिकांना फटका बसणार आहे. शेतकऱ्यांनी अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेती पिक या अवेळी बरसणाऱ्या पावसामुळे प्रभावित होऊन उत्पादनात घट येण्याची भीती आहे.
खरं तर या नवीन वर्षाची सुरुवात अवकाळी पावसाने झाली आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान कोरडे होते. यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा यांसारख्या पिकांना चांगले पोषक हवामान तयार होत होते.
परिणामी पिकांची चांगली वाढ झाली होती. आता मात्र पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम होणार आहे.
ज्या भागात रब्बी हंगामातील पिकांची वेळेवर पेरणी झाली आहे तेथील शेती पिके आता जवळपास अंतिम टप्प्यात आली आहेत.
अशातच जर पाऊस बरसला तर या पिकांच्या उत्पादनावर निश्चितच विपरीत परिणाम होणार आहे यात शंकाच नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे.
ज्येष्ठ हवामान अभ्यासक, हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी 9 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी 2024 दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार या कालावधीमध्ये प्रामुख्याने राज्यातील विदर्भ विभागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. या कालावधीत संपूर्ण विदर्भात ढगाळ हवामान कायम राहील आणि तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसेल असे त्यांनी म्हटले आहे.
विदर्भातील नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ, वाशिम या ५ जिल्ह्यांमध्ये १० आणि ११ फेब्रुवारीला पावसाची शक्यता अधिकच दिसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे मराठवाड्यात देखील ढगाळ हवामान कायम राहणार आहे. मराठवाड्यातील फक्त नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता अधिक जाणवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्यातील इतर भागात मात्र पावसाची शक्यता नाहीये. काही ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळू शकते मात्र पाऊस बरसणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.