Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी नुकतीच एक गुड न्युज समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने 19 मे 2024 ला मान्सूनचे अंदमानात आगमन झाले असल्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे 31 मे च्या सुमारास मान्सून केरळमध्ये येणार असा अंदाज आहे. 28 मे ते तीन जून या कालावधीत मानसूनचे केरळात आगमन होण्याची दाट शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर आपल्या राज्यात सहा जून ते नऊ जून या कालावधीमध्ये मान्सूनचे आगमन होणार असे म्हटले जात आहे. म्हणजे याहीवर्षी मान्सूनचे भारतात वेळेतच आगमन होणार अशी शक्यता भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
दुसरीकडे राज्यात गेल्या 10 ते 12 दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मात्र मोठे नुकसान होत आहे. तथापि हा अवकाळी पाऊस ऊस पिकासाठी फायदेशीर ठरत असल्याचे म्हटले जात आहे.
याशिवाय अवकाळी पावसामुळे काही भागातील उष्णतेचे प्रमाण कमी झाले आहे. अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैरान जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान भारतीय हवामान खात्याने आगामी पाच दिवस महाराष्ट्रात वादळी पाऊस सुरूच राहणार असा अंदाज दिला आहे. आगामी पाच दिवस महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाऊस बरसणार आहे तर काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
कोणत्या जिल्ह्यात बरसणार पाऊस?
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडणा आणि वाशीम तर मराठवाड्यातील सर्वच्या सर्व आठ जिल्ह्यांमध्ये तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर आणि नाशिक या जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
याशिवाय दक्षिण कोकणात देखील पाऊस होणार असा अंदाज आहे. उद्या अर्थातच 21 मे ला विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशीम या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच छत्रपती संभाजी नगर वगळता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता राहणार आहे.
तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर आणि नाशिक या जिल्ह्यात आणि दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे. बुधवारी आणि गुरुवारी देखील मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.