Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरे तर सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा ही पिके आता अंतिम टप्प्यात आली आहेत.
येत्या काही दिवसात गहू आणि हरभरा सोंगणीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहेत. काही ठिकाणी तर हरभरा सोंगणीची कामे सुरू देखील असतील. पण, अशातच मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट तयार होणार आहे. येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस त्राहीमाम माजवणार असा अंदाज समोर येत आहे.
ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्यांची काळजी वाढत आहे. दरम्यान, आता आपण पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय म्हटले पंजाबराव ?
पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार, राज्यात 26, 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. या कालावधीत राज्यातील पूर्व विदर्भात प्रामुख्याने अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.
पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, अचलपूर, अकोट, भंडारा, अमरावती, पुसद, यवतमाळ, चंद्रपूर, हिंगोली, बुलढाणा, वाशिम इत्यादी जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दुसरीकडे या कालावधीमध्ये राज्यातील उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान राहणार आहे.
तसेच मराठवाड्यामध्ये या कालावधीत हिंगोली आणि परभणी लगतच्या परिसरातही अगदी तुरळक स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अवकाळी पाऊस पडण्याचे कारण काय
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसात देशातील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथे गारपिट होण्याची शक्यता आहे. या राज्यांमध्ये गारपीटीची शक्यता असल्याने याचा परिणाम आपल्या महाराष्ट्रावर देखील पाहायला मिळणार आहे.
या गारपिटीमुळे राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता तयार होत आहे. मात्र या अवकाळी पावसाचा जोर पूर्व विदर्भातच अधिक राहणार आहे.