Maharashtra Rain : गेल्या महिन्यात कमकुवत भासणाऱ्या मान्सूनने जुलै महिन्यात जोरदार मुसंडी मारली आहे. कमकुवत मान्सूनचा जोर वाढला आहे. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात काही दिवस मान्सूनने विश्रांती घेतली होती. पण आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात आणि घाटमाथ्यावर मुसळधारा सुरु आहेत.
यामुळे कोकणात फिरणाऱ्या पर्यटकांना आणि शेत शिवारात रमणाऱ्या बळीराजाला आनंदाची अनुभूती येत आहे. यामुळे खरीपातील पिकांना जीवनदान मिळाले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढत आहे. राजधानी मुंबईसह राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात मुसळधारा सुरु आहेत. परिणामी वातावरण अल्हाददायक बनले आहे.
खरंतर मान्सून सुरू होऊन दीड महिन्यांचा कालावधी उलटला होता तरी देखील राज्यात जोरदार पाऊस होत नव्हता म्हणून शेतकऱ्यांची चिंता वाढत होती. मात्र आता जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात मान्सूनने जोर पकडला आहे. राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यात पावसाचा जोर खूपच अधिक आहे.
विदर्भातील पूर्व भागातील जवळपास 40 गावांचा संपर्क पावसामुळे तुटला आहे. तिथे जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेष बाब अशी की आगामी पाच दिवस महाराष्ट्रात मान्सूनचा जोर आणखी वाढणार आहे. भारतीय हवामान विभागाने पावसासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काही भागात अतिमुसळधार पाऊस होणार आहे, यामुळे काही भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
काही ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस होण्याची देखील शक्यता विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. याबाबत भारतीय हवामानशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी पाच दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा आहे.
बुधवारी अर्थातच आज उत्तर कोकणातील पालघर आणि दक्षिण कोकणातील रायगड या दोन जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आगामी दोन दिवस मध्य भारताच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असा अंदाज आहे. कोकण, सातारा, पुणे, नाशिक या जिल्ह्यातील घाट परिसरात पावसाचा जोर अधिक राहणार आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे.
कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट जारी झालाय ?
IMD ने वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, आज 19 जुलैला पालघर, रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी झाला आहे. उद्या २० जुलैला मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे सातारा, कोल्हापूर, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच 21 जुलैला रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.