Maharashtra Rain : जुलै महिन्याचा पहिला पंधरवाडा हा कोरडा गेला. काही भाग वगळता पहिल्या पंधरवड्यात महाराष्ट्रात पाऊस झाला नाही. यामुळे शेतकरी चिंतेत सापडले होते. मात्र जुलैच्या दुसऱ्या पंधरवाड्यात विशेषता गेल्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.
पण काही भागात अतिवृष्टी झाली. ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे तेथील शेती पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. जास्तीच्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आले आहेत. पूरग्रस्त भागात देखील शेतात आणि घरात पाणी घुसले आहे.
यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतजमिनी खरडल्या गेल्या आहेत.हजारो हेक्टर वरील खरीप हंगामातील पीक खराब झाले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. देशातील उत्तरेकडील राज्यात तर परिस्थिती आपल्या राज्याहून अधिक खराब आहे.
अनेक राज्यात पुरसदृश्य परिस्थिती तयार झाली असून अनेक भागाचा संपर्क तुटला आहे. हिमाचल प्रदेश मध्ये ढगफुटी झाली आहे. यामुळे तेथे घरांची पडझड होत आहे. काही पूल वाहून गेले आहेत यामुळे कनेक्टिव्हिटी तुटली आहे. परिणामी रेस्क्यू ऑपरेशन करताना प्रशासनाच्या नाकी नऊ येत आहेत.
दरम्यान आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार जलधारा बरसणार असल्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस?
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, आज अर्थातच 26 जुलै रोजी राज्यातील दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी झाला आहे.
याव्यतिरिक्त आज मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी झाला आहे. तसेच उद्या मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.
तर दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांसाठी तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर आणि विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.