Maharashtra Rain : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी पावसाचे सावट पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी वादळी वारे देखील वाहत आहे. मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी जोरदार वादळ आणि पावसाचे वातावरण तयार झाले होते. मुंबईत आलेल्या या वादळामुळे मोठ्या प्रमाणात जीवित हानी आणि वित्तहानी झाली. या वादळामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले.
मुंबईसहित राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी पावसाची हजेरी लागली असून काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. यामुळे, शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने मराठवाड्यातील हवामानासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट दिली आहे.
हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे, राज्यात 19 मे पर्यंत पावसाची शक्यता आहे. मराठवाडा विभागात पुढील तीन दिवस अर्थातच 19 मे पर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज 16 मे ते 19 मे 2024 या कालावधीत मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहतील असा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने मराठवाड्यात आणखी काही दिवस पाऊस कायम राहणार असे म्हटले आहे. प्रादेशिक हवामान केंद्राकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज अर्थातच 16 मे ला मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, लातूर, बीड, धाराशिव, जालना व नांदेड या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे.
म्हणजेच परभणी वगळता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात वादळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे. विशेष म्हणजे या संबंधित जिल्ह्यात वाऱ्याचा वेग देखील अधिक राहणार आहे. ताशी 40 ते 50 किलोमीटर या वेगाने या जिल्ह्यात वारे वाहण्याची शक्यता आहे.
परिणामी संबंधित जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. उद्या १७ मे ला छत्रपती संभाजीनगर आणि जालना हे दोन जिल्हे वगळता संपूर्ण मराठवाड्यात पावसाची शक्यता राहणार आहे.
18 तारखेबाबत बोलायचं झालं तर 18 तारखेला लातूर, बीड, परभणी, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यात पावसाची शक्यता राहणार आहे. १९ मे रोजी पावसाचे प्रमाण काहीसे कमी होणार आहे. या दिवशी मराठवाड्यातील लातूर, धाराशिव व नांदेड या 3 जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जना अन पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
१९ मे नंतर मात्र पावसाची तीव्रता कमी होत जाणार आहे. दुसरीकडे यावर्षी 19 मेला अंदमानात मान्सूनचे आगमन होणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून केरळमध्ये 31 मे पर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.