Maharashtra Rain : राज्यातील विदर्भ विभागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असणारे वादळी पावसाचे सत्र आता थांबले आहे. यामुळे तेथील शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळणार आहे. खरेतर गेल्या सहा ते सात दिवसांपासून विदर्भात सातत्याने ढगाळ हवामान अन पावसाचे वातावरण तयार होत होते.
विशेष म्हणजे विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीने तडाखा दिला आहे. मात्र आता विदर्भातला पाऊस पूर्णपणे थांबला असल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने देखील विदर्भासाठी कोणताच अलर्ट जारी केलेला नाही.
यावरून आता तेथील वादळी पावसाचे सत्र थांबले आहे आणि तेथील हवामान पुढील काही दिवस कोरडे राहील असे स्पष्ट होत आहे. मात्र असे असले तरी वादळी पावसाचे सावट अजूनही पूर्णपणे दूर झालेले नाही. कारण की भारतीय हवामान खात्याने राज्यात बुधवार पर्यंत पावसाची शक्यता असल्याचा अंदाज दिला आहे.
विदर्भ सोडून राज्यातील इतर काही विभागांमध्ये हवामान खात्याने पुन्हा एकदा वादळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज यावेळी जारी केला आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात आज पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.
विशेष म्हणजे पुढील तीन दिवस येथे पाऊस सुरूच राहणार आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे तीन दिवस कोकण मध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे.
त्यामुळे सदर विभागातील शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपल्या कांदा पिकाची विशेष काळजी घ्यावी असे आव्हान यावेळी करण्यात आले आहे.
तसेच इतर रब्बी पिकांची आणि फळ पिकांची देखील सदर विभागातील शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे. कारण की, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या तिन्ही विभागातील काही जिल्ह्यांना बुधवारपर्यंत येलो अलर्ट देण्यात आला आहे.
आयएमडीने म्हटल्याप्रमाणे विदर्भ विभागातील वार्याची चक्रीय स्थिती आता कोकण, मध्य महाराष्ट्राकडे वळाल्याने विदर्भातील पाऊस थांबला असून तो कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पडेल, असा अंदाज आहे.
15, 16 आणि 17 एप्रिलला या भागात पाऊस होणार अशी शक्यता आहे. एकंदरीत, विदर्भातील अवकाळी पावसाचे सत्र आता थांबले असल्याने तेथील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
मात्र हा मान्सून पूर्व पाऊस आता राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात धुमाकुळ घालणार अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.