Maharashtra Rain : गेला ऑगस्ट महिना महाराष्ट्रासाठी खूपच त्रासदायक ठरला आहे. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात एकदाही मुसळधार पाऊस झाला नाही. यामुळे खरीप हंगामातील पिके अक्षरशः करपलीत. ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याची उपलब्धता होती त्यांचीच पिके वाचली आहेत. दरम्यान सप्टेंबरची सुरुवात पावसाने झाली. सुरुवातीच्या आठवड्यात राज्यातील काही भागात हलका पाऊस झाला.
दुसऱ्या आठवड्यात मात्र राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढला. सात सप्टेंबर ते नऊ सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला. पण या कालावधीमध्ये देखील महाराष्ट्रातील काही भागात पाऊस झालाच नाही. परंतु ज्या भागात पाऊस झाला तेथील शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला होता.
परंतु राज्यात आता जवळपास 10 सप्टेंबर पासून कुठेच पाऊस पाहायला मिळत नाहीये. काल काही भागात हलका पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे मात्र सध्या शेतकऱ्यांना जोरदार पावसाची गरज आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. जोरदार पाऊस केव्हा होतो याचीच शेतकरी वाट पाहत आहेत.
अशातच भारतीय हवामान विभागाने एक महत्वाची आणि शेतकऱ्यांसाठी विशेष कामाची माहिती दिली आहे. हवामान विभागाने आपला नवीन हवामान अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार राज्यात आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे. आज विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असा अंदाज आय एम डी च्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार आज विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज या संबंधित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय जळगाव, धुळे, नंदूरबार या उत्तर महाराष्ट्रातील अर्थातच खानदेश मधील तिन्ही जिल्ह्यात ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो असे हवामान विभागाने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. याशिवाय मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक आणि कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
16 सप्टेंबरला या जिल्ह्यात पडणार जोरदार पाऊस
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, विदर्भातील यवतमाळ, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना तसेच खानदेश जिल्ह्यातही ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या संबंधित भागांसाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी करण्यात आला आहे.
तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा, कोकणाच्या दक्षिण भागातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील उद्यासाठी अर्थातच 16 सप्टेंबर साठी ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडणार असा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
यामुळे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्यातून पुन्हा एकदा पावसाने विश्रांती घेतली असल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य जनतेला यामुळे दिलासा मिळेल असे सांगितले जात आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार जर महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाला तर त्या संबंधित भागातील शेती पिकांना नवीन जीवदान मिळेल आणि धरणांमधील जलाशयाचा साठा वाढेल असे मत जाणकार लोकांकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे हवामान विभागाचा हा अंदाज तरी प्रत्यक्षात खरा उतरावा अशी इच्छा शेतकऱ्यांची आहे.