Maharashtra Rain : आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे पावसाबाबत. खरंतर राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. ऑगस्ट महिन्यात जवळपास 25 ते 26 दिवसांचा पावसाचा खंड पडला होता, या पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामातील पिके जळून खाक झाली आहेत.
ज्या शेतकऱ्यांकडे थोड्याफार प्रमाणात पिकाला देण्यासाठी पाणी आहे त्यांची पिके मात्र तग धरून आहेत. परंतु जर येत्या काही दिवसात पाऊस झाला नाही तर तीही पिके करपतील अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे जर आता आगामी काही दिवसात पाऊस झाला नाही तर संपूर्ण राज्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
यामुळे मुंबई, पुण्यासारख्या शहरात पाणी कपातीला सामोरे जावे लागू शकते. खरंतर या वर्षी सुरुवातीपासूनच मान्सूनचा लहरीपणा पाहायला मिळाला. मान्सूनच्या पहिल्या महिन्यात अर्थातच जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात असे नुकसान झाले. परंतु जुलै महिन्यात राज्यात पावसाच जोरदार कमबॅक झाल आणि जून महिन्यातील पावसाची तूट भरून निघाली.
पण या ऑगस्ट महिन्यातील फक्त चार ते पाच दिवस राज्यात समाधानकारक असा पाऊस झाला आहे उर्वरित दिवस मात्र महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडेच राहिले आहे. अशा स्थितीत आता सप्टेंबर महिन्यात कसा पाऊस पडतो यावरच या खरीप हंगामाचे असं म्हणण्यापेक्षा संपूर्ण वर्षाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने आज सप्टेंबर महिन्यातील चारही आठवड्यांचा दीर्घकालीन हवामान अंदाज जारी केला आहे.
अशा स्थितीत आज आपण हा हवामान अंदाज थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हवामान विभागाने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, सप्टेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यामध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर सप्टेंबरमध्ये मध्यापर्यंत चांगला पाऊस पडू शकतो, असं या हवामान अंदाजात नमूद करण्यात आले आहे.
दक्षिण द्वीपकल्प, महाराष्ट्रात मराठवाडा, कोकण तसेच गोवा यासह मध्य भारतातील काही भागांत पावसाच्या चांगल्या पुनरागमनाची शक्यता हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
एकंदरीत सप्टेंबर महिन्यात हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार जर सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडला तर राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असे बोलले जात आहे.