Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये पावसाची उघडीप आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या महिन्यात अर्थातच जून महिन्यात महाराष्ट्रात खूपच कमी पाऊस झाला. राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. पण भारतीय हवामान खात्याने जून महिन्यापेक्षा जुलै महिन्यात पावसाची तीव्रता अधिक राहणार असे स्पष्ट केले आहे.
जुलै महिन्यात राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे.या महिन्यात राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये 106% पाऊस पडणार असा अंदाज आहे. तसेच सहा जिल्ह्यांमध्ये 94 ते 104% पाऊस पडण्याची शक्यता आहे.
म्हणजेच राज्यात सरासरी एवढा ते सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडणार असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होत असल्याने आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
आजपासून राज्यातील कोकण आणि घाटमाथा परिसरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असे आयएमडीने स्पष्ट केले आहे. गेल्या महिन्यात कोकण आणि घाटमाथा परिसरावर चांगला पाऊस झाला होता.
आता याच भागात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच आज पूर्व विदर्भात सुद्धा जोरदार पाऊस होणार तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असा अंदाज देण्यात आला आहे.
यामुळे आज राज्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आणि काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. काल राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.
आजपासून मात्र कोकण आणि घाटमाथा परिसरावर पावसाची तीव्रता वाढणार आहे. खरे तर जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपत आला आहे. मात्र अजूनही अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ हवामान तयार झाले आहे. पुन्हा राज्यात जोरदार पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणातील सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या तिन्ही जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच उत्तर कोकणातील ठाणे, दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच आज उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.