Maharashtra Rain : गेली सात ते आठ दिवस राज्यात जोरदार पाऊस होत आहे. अनेक भागात ढगफुटी सारखा पाऊस झाला आहे. अतिवृष्टी झाल्याने अनेक भागात शेतशिवार जलमग्न झाली आहेत. नद्या दुथडी ओसांडून वाहत असून पाण्याची पातळी वाढली आहे. अनेक नद्यांना पूर आले आहेत.
ओढे-नाले, तलाव तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. धरणाच्या जलाशयात देखील वाढ झाली आहे. काही भागातील विहिरींना पाणी उतरले आहे. मात्र जास्तीच्या पावसामुळे काही भागातील पिकांना फटका बसला आहे. अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी शेतात पाणी साचले आहे.
यामुळे पिके सडण्याची भीती आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने पावसाबाबत एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. हवामान विभागानुसार आजपासून राज्यात पावसाचा जोर ओसरणार आहे. मात्र असे असले तरी राज्यातील काही भागात आजही अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यात पुणे शहरात हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र घाट विभागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रातील विविध भागात गेल्या सात ते आठ दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे.
दरम्यान अजूनही महाराष्ट्रावर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने पावसासाठी पोषक परिस्थिती देखील तयार होत आहे. राज्यात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने याचा परिणाम म्हणून आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
अतिवृष्टीची शक्यता पाहता संबंधीत विभागातील नागरिकांनी थोडं सतर्क राहणे जरुरीचे आहे. खरंतर मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील बहुतांशी भागात गेली सात ते आठ दिवस जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला असून विदर्भात आणि कोकणात अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
अशातच मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने आणि अतिवृष्टीची शक्यता असल्याने तेथील जनजीवन विस्कळीत होण्याची भीती आता व्यक्त होऊ लागली आहे.