Maharashtra Rain : गेल्या जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. या चालू जुलै महिन्यात देखील सुरुवातीला राज्यात फारसा पाऊस झाला नाही. जुलैचा पहिला आठवडा हा जवळपास कोरडाच होता. मात्र, पहिल्या आठवड्यानंतर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगल्या दमदार पावसाची हजेरी लागली.
तथापि, अजूनही अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. अशातच गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु आता पावसाच्या विश्रांतीचा काळ हा संपला आहे. कारण की पुन्हा एकदा राज्यात जोरदार पाऊस होणार असा अंदाज आता समोर आला आहे.
भारतीय हवामान खात्याने आजपासून पावसाचा जोर वाढणार असे म्हटले आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, आज आणि उद्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भ तथा पश्चिम विदर्भात जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज देण्यात आला आहे.
आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे आज उत्तर कोकणातील ठाणे, दक्षिण कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरावर जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. या संबंधीत जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट मिळाला आहे.
तसेच आज दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, उत्तर कोकणातील पालघर, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, नाशिक आणि विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत बहुतांश भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या संबंधित जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. उद्या कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार असा अंदाज आहे. उद्या विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.