Maharashtra Rain : गेल्या काही वर्षांमध्ये निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. नैसर्गिक आपत्यांमुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाहीये. कित्येकदा शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता आलेला नाहीये.
अशा परिस्थितीत, राज्यासहित देशातील अनेक शेतकरी बांधव कर्जबाजारी झाले आहेत. दरम्यान, मागील वर्षी देखील पावसाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
गेल्यावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळी काळात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यामुळे खरीप हंगामातील अनेक पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. खरीप हंगाम वाया गेला पण रब्बी हंगामातून आता बऱ्यापैकी उत्पादन निघेल अशी आशा शेतकऱ्यांना होती.
यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याची उपलब्धता होती त्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांची पेरणी केली. दरम्यान रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झाली आणि अवघ्या काही दिवसातच अवकाळी पावसाला सुरुवात झाली.
नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचे हजेरी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यात तर राज्यातील उत्तर महाराष्ट्रात गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली.
यामुळे तेथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान गेल्या वर्षीच हे संकट डिसेंबर अखेरपर्यंत पूर्णपणे निवळेल अशी आशा होती. मात्र शेतकऱ्यांची ही आशा देखील फोल ठरली असून या नवीन वर्षाची सुरुवातही अवकाळी पावसाने झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मात्र राज्यातील हवामानात बदल झाला असून पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढू लागला आहे. पण आता ही परिस्थिती देखील लवकरच पालटणार आहे.
कारण की ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यातील काही भागांमध्ये 25 जानेवारीपर्यंत ढगाळ हवामानाची आणि अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. डख यांनी म्हटल्याप्रमाणे, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात 25 जानेवारीपर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.
या दोन्ही विभागात आकाश निरभ्र राहील असा अंदाज आहे. दुसरीकडे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात 25 जानेवारी पर्यंत दुपारी ढगाळ हवामान आणि रात्री कडाक्याची थंड पडणार असा अंदाज आहे.
मात्र राज्यातील पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये 25 जानेवारीपर्यंत ढगाळ हवामान आणि काही ठिकाणी तुरळक पाऊस बरसणार असा अंदाज पंजाबरावांनी यावेळी वर्तवला आहे. यामुळे पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना विशेष सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.