Maharashtra Rain : सध्या महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे. पावसाचा जोर हा कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथा परिसरावर सर्वात जास्त पाहायला मिळाला. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली आहे.
यामुळे अनेक धरणांमध्ये पाण्याची आवक अचानक वाढली असून यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. राज्यातील अनेक नद्यांना देखील पूर आला आहे. यामुळे अनेक ठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळत असून सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.
याशिवाय या पूरस्थितीचा खरीप हंगामातील पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. अनेक भागांमधील खरिपातील पिके पाण्याखाली आली असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. कोकणातील रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर अशा भागांमध्ये पूर परिस्थिती तयार झाली आहे.
यामुळे मुसळधार पावसाचे हे सत्र आता कधी थांबणार असा सवाल उपस्थित केला जातोय. अशातच आता भारतीय हवामान खात्याने याच संदर्भात एक मोठी अपडेट दिली आहे. हवामान खात्याने आज आणि उद्या म्हणजे 27 जुलैपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मात्र 27 जुलै नंतर पावसाचा जोर थोडासा कमी होणार असा अंदाज आहे. हवामान विभागाने आज अर्थातच 26 जुलै रोजी राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्र विभागातील सातारा जिल्ह्यांत अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांसाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मात्र मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार असे आयएमडीने यावेळी स्पष्ट केले आहे. पण, 27 जुलैनंतर पावसाचा जोर ओसरणार आहे.
एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून जे पावसाचे तांडव सुरू होते ते पावसाचे तांडव येत्या काही तासांनी शमणार आहे. यामुळे पूर परीस्थिती पुन्हा एकदा निवळणार आणि सर्वसामान्य जनजीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर येणार अशी आशा आहे.
तथापि, आज आणि उद्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्याने संबंधित जिल्ह्यातील नागरिकांनी अधिक सतर्क रहावे असेही जाणकार लोकांनी सांगितले आहे. खूपच गरजेचे असेल तेव्हाच घराबाहेर पडा अन्यथा घरातच थांबा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.