Maharashtra Rain : महाराष्ट्रात सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. काही भागात रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. ज्या भागात पावसाळी काळात थोडा चांगला पाऊस झाला आहे तसेच ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत पाणी उपलब्ध आहे त्या शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणी सुरू केली आहे.
मात्र महाराष्ट्रातील काही भागात दुष्काळाचे भीषण सावट असल्याने रब्बी हंगामातील पिकांची त्या भागात पेरणी होण्याची शक्यता खूपच कमी आहे. दरम्यान रब्बी हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना आता पावसाची गरज भासू लागली आहे.
यामुळे अवकाळी पाऊस का होईना पण पाऊस बरसला पाहिजे असे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. अशातच आता राज्यातील हवामानात देखील थोडासा बदल होऊ लागला आहे.
तापमानात खूप चढ-उतार पाहायला मिळत आहे. दरम्यान हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे या पावसाचा रब्बी हंगामातील पिकांना फायदा होऊ शकतो असा आशावाद व्यक्त होऊ लागला आहे.
राज्यातील कोणत्या भागात बरसणार पाऊस
खरंतर, यंदा मान्सून काळात म्हणजेच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात फक्त 88% एवढा पाऊस झाला आहे. म्हणजेच सरासरीच्या तुलनेत यावर्षी 12 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.
याचा परिणाम म्हणून खरीप हंगामातील सोयाबीन कापूस मका यांसारख्या सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. शिवाय कमी पावसामुळे आगामी रब्बी हंगाम देखील प्रभावित होण्याची शक्यता नाकारून चालणार नाहीये.
यामुळे रब्बी हंगामाच्या पिकांसाठी आता शेतकऱ्यांना पावसाची गरज भासू लागली आहे. अशातच हवामान खात्याने कोकणातील आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवला आहे.
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे आज अर्थातच चार नोव्हेंबर 2023 आणि उद्या पाच नोव्हेंबर रोजी कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज सिंधुदूर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला असून या संबंधित जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच उद्या अर्थातच पाच नोव्हेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात ढगांच्या गडगडासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर या दोन्ही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे. विशेष म्हणजे रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्यात रविवारी देखील पावसाची शक्यता आहे.
यामुळे आता हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरतो का आणि यासंबंधीत जिल्ह्यांमध्ये ऐन हिवाळ्यात पाऊस बरसतो का हे पाहण्यासारखे राहणार आहे.