Maharashtra Rain : जून महिन्यात महाराष्ट्रात पावसाचा लपंडाव सुरू होता. अनेक भागात जून महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली. जुलै महिन्याची सुरुवात देखील निराशा जनक राहिली. मात्र जुलै च्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढला. विशेषता जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला.
जास्तीच्या पावसाने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे सर्वसामान्य जनजीवन देखील विस्कळीत झाले होते. शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांना सुद्धा याचा मोठा फटका बसला. दरम्यान आता गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यातील अनेक भागात पावसाने उसंत घेतली आहे. पण आज पासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर काहीसा वाढणार आहे. आज राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट मिळाला आहे. दुसरीकडे उर्वरित राज्यात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार असा अंदाज आहे.
उद्यापासून म्हणजेच गुरुवारपासून मात्र राज्यातील बहुतांशी भागांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. हवामान खात्याने आज कोकण मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा परिसर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
आज उत्तर कोकणातील ठाणे, दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच आज विदर्भातील उर्वरित नऊ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या पार्श्वभूमीवर विदर्भातील या संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट मिळाला आहे.
उद्यापासून कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि विदर्भात पावसाचा जोर आणखी वाढणार असे आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे. मध्य महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरावर उद्यापासून पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.
खरंतर जून महिन्यात राज्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला होता. मात्र जुलै महिन्यात पावसाने महाराष्ट्राला अक्षरशा झोडपून काढले आहे. यामुळे जून महिन्यातील पावसाची तूट जुलै महिन्यात भरून निघाली आहे.
राज्यातील अनेक धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली असून मध्यंतरी राज्यातील काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग देखील करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे पुढे ऑगस्ट महिन्यातही महाराष्ट्रात चांगला जोराचा पाऊस होणार असे हवामान खात्यातील काही तज्ञांचे म्हणणे आहे.