Maharashtra ST Bus News : राज्यात प्रवासासाठी एसटीचा वापर सर्वाधिक केला जातो. एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी प्रामुख्याने एसटी बसचा वापर होतो. मात्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसच्या प्रवासी संख्येत गेल्या काही वर्षांपासून घट आली आहे.
विशेषता कोरोना काळापासून एसटीची प्रवासी संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. अशातच एसटीची प्रवासी संख्या वाढवण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. विशेष म्हणजे राज्य शासनाने देखील एसटी महामंडळाची प्रवासी संख्या वाढवण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना सुरू केल्या आहेत.
यामध्ये 75 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना एसटीचा मोफत प्रवास दिला जात आहे. तसेच राज्यातील महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. म्हणजेच राज्यातील महिलांना आता अर्ध्या तिकिटात एसटीने प्रवास करता येत आहे. राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
प्रवासी संख्या खूपच वाढली आहे. एका आकडेवारीनुसार राज्य शासनाने घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न 20 ते 25 टक्के वाढले आहे. अशातच आता राज्यातील महिलांना अष्टविनायकाचे दर्शन स्वस्तात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एस टी प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी महामंडळाच्या चिपळूण आगाराने आता महिलांना स्वस्तात अष्टविनायकाचे दर्शन घडवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. चिपळूण आगाराने घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार जर चिपळूण आगारातून महिलांनी अष्टविनायक दर्शनासाठी ग्रुप बुकिंग केले तर त्यांना केवळ 655 रुपयात अष्टविनायकाचे दर्शन घेता येणार आहे.
चिपळूण आगाराने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांची संख्या वाढण्यासाठी चिपळूण आगाराकडून श्रावण महिन्यात दर सोमवारी सकाळी मार्लेश्वर बसफेरी सोडण्यात येणार आहे. ही बस दर सोमवारी सकाळी आठ वाजता आगारातून रवाना होणार आहे. दरम्यान महिलांसाठी सुरू झालेल्या ग्रुप बुकिंग योजनेचा लाभ घ्यावा आणि अष्टविनायकांचे दर्शन स्वस्तात करावे असे आवाहन आगाराच्या माध्यमातून यावेळी करण्यात आले आहे.